spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राशन कार्यालयातील सर्व्हर समस्येमुळे नागरिक त्रस्त; शिवसेनेचे अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

नागपूर :- नागपूर शहरातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या रेशन कार्ड कार्यालयांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेने च्यावतीने अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, नवीन रेशन कार्ड काढणे, कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करणे, माहितीतील दुरुस्ती, ई-केवायसी तसेच इतर विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागते. मात्र, कार्यालयातील ऑनलाइन सर्व्हर सतत बंद पडत असल्याने किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक तास प्रतीक्षा करूनही कामे होत नाहीत. परिणामी नागरिकांना पुन्हा पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा वेळ आणि आर्थिक नुकसान होत आहे. विशेषतः दक्षिण नागपूर, हुडकेश्वर रोड तसेच शहराच्या दूरवरच्या भागांतून सिव्हिल लाईन्स येथील अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा संपूर्ण दिवस वाया जात आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार व गरीब कुटुंबांची दिवसाची मजुरी बुडत असून, त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन ऑनलाइन सर्व्हर कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना वेळेत व विनाअडथळा सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. यावेळी सिद्धेश्वर (सिद्धू) कोमजवार, मन्नू दत्ता, मुन्नाजी महाजन, राठीजी, ललित नायडू, दीपक पोहणेकर, उपाध्येयजी, मनोज कुहीकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles