हंसराज,भंडारा साकोली :- अमली पदार्थ तस्करीविरोधात भंडारा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, साकोली पोलिसांनी सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचून तब्बल १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९९ लाख ७८ हजार रुपये किमतीचा १९९.५६० किलो गांजा आणि ३५ लाख रुपयांचा ट्रक यांचा समावेश आहे. याप्रकरणी बिहार आणि पश्चिम बंगालमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा मिळालेल्या माहितीनुसार, राजनांदगावकडून नागपूरच्या दिशेने एका ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती साकोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलिसांनी २७ जुलै २०२६ रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास सेंदूरवाफा टोलनाक्यावर नाकाबंदी करून सापळा रचला.
ट्रकमध्ये आढळला १९९ किलो गांजा संशयास्पद टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक WB 23 F 8785) टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तो अडवला. ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये १९९.५६० किलो गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत प्रति किलो ५० हजार रुपये असून एकूण किंमत ९९ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजासह ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन आरोपींना बेड्या या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालक पंकजकुमार भूषण यादव (वय ३०, रा. खुजहटिता, जि. छपरा, बिहार) आणि क्लिनर बापी बादल मालीक (वय ३८, रा. नवग्राम, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६०६/२०२६ कलम ८(क), २०(ब), ii (क )अन्वये, एनडीपीएस ॲक्ट १९८५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर मानकर, अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी आणि पोलीस अमलदार नरेंद्र झलके, सचिन राउत, टेकचंद बुरडे, गोविंद शिंदे, धनविजय गणवीर, या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जितेंद्र राऊत करीत आहेत.





