नागपूर :- टीईटी, एमपीएससी तसेच अलीकडे पार पडलेल्या एमएच- सीईटी परीक्षांबाबत विविध स्तरांवर उपस्थित झालेल्या कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आलेल्या शंकांमुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी नागपूर येथील CJP चे समन्वयक, प्रा.सचिन काळबांडे यांनी केली आहे. लाखो विद्यार्थी अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर या स्पर्धा परीक्षा देत असल्याने परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताचे संपूर्ण संरक्षण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि तांत्रिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शासनाने आवश्यक सुधारणा तातडीने राबवाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने सातत्याने आवाज उठविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
टीईटी, एमपीएससी व एमएच-सीईटी परीक्षांतील कथित अनियमिततेची पारदर्शक चौकशी करा; विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी









