spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अस्थिका समाज, नागपूरतर्फे १२ ते १४ ऑगस्टदरम्यान १९ व्या दीपोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन १२ ऑगष्ट पासून

– आदिपुरम दिनानिमित्त सुहासिनींची दीपपूजा, चेन्नईच्या आध्या वेंकटेश यांचे प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

नागपूर :- अस्थिका समाज, नागपूरच्या वतीने यंदा १९ व्या वर्षाचा दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोरील श्री भगवती सभागृहात हा तीन दिवसीय धार्मिक सोहळा १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी समाजाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील विविध भागांतील तसेच विविध समाजघटकांतील मोठ्या संख्येने सुहासिनींनी १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिपुरम दिनाच्या दीपपूजेसाठी नावनोंदणी केली आहे. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

१२ ऑगस्ट, बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता गणपती पूजन व घटस्थापनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर चेन्नई येथील युवा प्रवचनकार आध्या वेंकटेश (स्मा. विशाखा हरी यांच्या शिष्या) यांचे विशेष संकीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. त्या पहिल्या दिवशी ‘श्री शंकर गुरुवरम’ या विषयावर तर १३ ऑगस्ट रोजी ‘सदा श्रेष्ठम् दयानिधिम’ या विषयावर प्रवचन करतील. त्यांच्या प्रवचनाला मास्टर हरेश मृदंगावर तर मास्टर नवनिधा कृष्णन व्हायोलिनवर साथ देणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी मुख्य आदिपुरम दिनाचे कार्यक्रम सकाळी ७.२० वाजता गणपती पूजन, कन्या पूजन आणि कुमारी पूजनाने सुरू होतील. त्यानंतर स्वावलंबी नगर येथील वैदिक संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून गुरुजी प्रवीण लिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपारायण सादर करण्यात येईल. सकाळी १० वाजता सुहासिनींची मुख्य दीपपूजा पार पडणार असून, या धार्मिक विधीत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. यानंतर श्रीनगर येथील ‘अहिगिरी नंदिनी’ महिला समूहाकडून ‘महिषासुर मर्दिनी’ या गीतावर आधारित विशेष नृत्य सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप दुपारी १२.३० वाजता देवी अंडाळ आणि देवी भवानी यांच्या मंगळआरतीने होईल. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. अस्थिका समाजाच्या व्यवस्थापन समितीने दीपपूजेसाठी नावनोंदणी केलेल्या सर्व सुहासिनींना सकाळी ७ वाजेपर्यंत सभास्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेत सुरू करता येतील. तसेच नागपूर व परिसरातील भाविकांनी तीनही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी भवानी आणि देवी अंडाळ यांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहिती तसेच नावनोंदणीसाठी इच्छुकांनी अस्थिका समाजाचे सचिव के. व्ही. नगराजन यांच्याशी संपर्क साधावा, असे समाजातर्फे कळविण्यात आले आहे.

Popular Articles