– 30 दिवसात 1 हजार कोटी वसुलीचे आयुक्तांचे लक्ष्य
नागपूर :- शहराच्या विकासासाठी मालमत्ता कराची वसुली आवश्यक असून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कर संग्रहकांनी मालमत्ताधारकांवर चल-अचल संपत्ती जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.
थकीत मालमत्ता कर वसुली करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर वसुली अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. २३) नियोजन भवनात कर संग्रहकांची कार्यशाळा पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त अनिकेत धोपड, राजकुमार मेश्राम, हरीश राऊत, प्रमोद वानखेडे, विकास रायबोले, धनंजय जाधव यांच्यासह सर्व झोनचे कर संग्रहक व सुपरवायझर उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात व मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम. आणि मिलिंद मेश्राम करीत आहे. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील एकूण मालमत्ता कराची थकबाकी 2250 कोटी रुपये असून या मोहिमेअंतर्गत 1 हजार कोटी रुपयांची वसुली व्हावी, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. यासाठी सर्व कर संग्रहकांनी सर्वाधिक थकीत कर असलेल्यांची यादी करावी व त्यांच्याकडून वसुलीसाठी तगादा लावावा. थकीत रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यात पिण्याच्या पाण्याचे नळाचे कनेक्शन कापण्याचे अधिकार देण्यात आले. याशिवाय व्यावसायिक मालमत्ता असल्यास तेथील चल संपत्ती जप्तीची कारवाई करावी. त्या कारवाईचे फोटो व व्हीडीओ काढून प्रसिद्धीस द्यावे, यामुळे दुसऱ्या थकबाकीदारांवर वचक निर्माण होईल.
आवश्यकता असल्यास पोलीस पथक
ही कारवाई करताना कोणत्याही दबावाला कर संग्रहकांनी बळी पडू नये. काही संवेदनशील ठिकाणी कर संग्रहकांनी एनडीएसचे पथक किंवा पोलीस पथक घेऊन जावे. यासंदर्भात तशी मागणी केल्यास पोलीस पथक पुरविण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.

उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार
कर वसुलीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर संग्रहकांना पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा आयुक्त डॉ. विपीन यांनी यावेळी केली.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई
कर वसुलीमध्ये सहभाग न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. कर संग्रहकांना कर वसुलीचे मुख्य काम असताना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम यांनी पीपीटीच्या सहाय्याने या अभियानाची माहिती दिली. तसेच कर संग्रहकांनी जप्तीची किंवा नोटीस बजाविण्याची कारवाई कशी करावी, याबद्दल कर संग्रहकांना मार्गदर्शन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी प्रत्येक कर संग्रहकांनी सर्वाधिक थकबाकीदारांची यादी तयार करावी. न्यायालयात दावे असलेल्या मालमत्ता सोडून इतर व्यावसायिक मालमत्ताची थकीत रक्कम वसुलीला कर संग्रहकांनी प्राधान्य द्यावे, अशी सूचना मेश्राम यांनी केली. याशिवाय मालमत्ता कर विभागाच्या आस्थापनेवर असणारे परंतु, कामास्तव इतर विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबधित विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त करावे अन्यथा संबंधित विभाग प्रमुखांवर देखील कार्यवाही केली जाणार असल्याचे निर्देशित केले आहे.








