spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निर्भय प्रभात फेरी

नागपूर :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी २० ऑगस्ट रोजी समितीतर्फे निर्भय प्रभात फेरी काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. यंदा डॉ. दाभोळकर यांच्या निधनाला १३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या वतीने संविधान चौक ते जुने मॉरिस कॉलेज आणि पुन्हा संविधान चौक अशी निर्भय प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीत नागपूर जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, शिवांगीनगर, टेकऑफ सिटी, प्रेरणानगर, फुलमतीनगर तसेच इतर शाखांमधील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मुख्य अतिथी अशोक जांभुळकर आणि ज्ञानेश्वर रक्षक यांच्या हस्ते प्रभात फेरीमधे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रभात फेरीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर रक्षक, राम काळे, चित्तरंजन चौरे, प्रा. पुष्पा घोडके, रामभाऊ डोंगरे, प्रा. संध्या राजूरकर आणि इतर मान्यवरांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याला उजाळा देत विचार व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी देवानंद बडगे, देवयानी भगत, शोभा पाटील, सुषमा शेवडे, मंगला गाणार, कांबळे, प्रीती तिरपुडे, शिल्पा मकेश्वर आणि इतर अनेक सदस्यांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला अभिवादन करणारी गीते सादर केली. डॉ. सुनील भगत यांनी प्रभात फेरीचे तसेच कार्यक्रमाचेही संचालन केले. उमेश चिट्टे यांनी प्रभात फेरी आणि कार्यक्रमाची छायाचित्रे काढली. ज्योत्स्ना बनसोड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या शैलेश नरवाडे दिग्दर्शित ‘जयंती २’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी ‘जयंती २’चे विशेष कलाकार किरण काशिनाथ, अक्षय खोब्रागडे आणि इतर कलाकार उपस्थित होते. विजयकांत पाणबुडे यांनी ‘जयंती २’ या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपस्थितांनी केले. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या खटल्याला गती देऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या निर्भय प्रभात फेरीच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला.

Popular Articles