spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

– ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा नशामुक्तीचा संकल्प; १४२ कार्यक्रमांतून जनजागृती

कामठी :- नशेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती वाढवून युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, ब्रह्माकुमारीज सेंटर कामठीच्या वतीने २ ते २० ऑगस्टदरम्यान राबविण्यात आलेल्या नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.

शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये तब्बल १४२ कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून सहभागी नागरिकांना नशेमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. नशेपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच कुटुंब आणि समाजालाही व्यसनमुक्त करण्याचा संदेश देण्यात आला.

विशेष म्हणजे, आजच्या डिजिटल युगात युवकांमध्ये वाढत असलेल्या सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग आणि इंटरनेट गेमिंगच्या अतिरेकाबाबत ‘डिजिटल वेलनेस’चा संदेश देत योग्य व संतुलित डिजिटल वापराबाबतही जनजागृती करण्यात आली.

ब्रह्माकुमारीज सेंटर कामठीच्या संचालिका बी. के. प्रेमलता यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्माकुमारी भगिनी व सेवाधाऱ्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये पोहोचून युवकांना राजयोग मेडिटेशन, सकारात्मक चिंतन, आत्मजागरूकता आणि आत्मबलाच्या माध्यमातून निरोगी, शांततापूर्ण व व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश दिला.

अभियानादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. राजयोग ध्यानाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि दृढसंकल्प वाढविण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नशेपासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही व्यसनापासून वाचविण्याचा संकल्प केला.

या अभियानाचा संपूर्ण अहवाल व आकडेवारी ब्रह्माकुमारीजच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आली असून, भारतभर सुरू असलेल्या अभियानाची एकत्रित माहिती माउंट आबू येथून भारत सरकारकडे सादर केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“नशेला नकार, निरोगी जीवनाला होकार” या संदेशातून राबविण्यात आलेले हे अभियान निरोगी युवक, सक्षम कुटुंब आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Popular Articles