संदीप कांबळे,कामठी :- सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेल्या साखरेच्या दराने अचानक मोठी झेप घेतल्याने कामठी तालुक्यात महागाईचा चटका अधिक तीव्र झाला आहे. काही दिवसापूर्वी ४० रुपये किलोच्या आसपास मिळणारी साखर आता थेट ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला तब्बल ३० रुपयांची झळ बसली आहे. साखरेच्या या झपाट्याने वाढलेल्या दरामुळे गृहिणींच्या महिन्याच्या बजेटचे गणित बिघडले असून, सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दैनंदिन चहापासून घरगुती पदार्थ, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांपर्यंत साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ एका वस्तूपुरता मर्यादित न राहता अन्य खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. आधीच डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना साखरेच्या दरवाढीने आणखी एक आर्थिक धक्का बसला आहे.
कामठी शहरासह तालुक्यातील किराणा बाजारात साखरेच्या दरातील वाढ ग्राहकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४० रुपयांवरून थेट ७० रुपये किलो असा दर पोहोचल्याने साखर खरेदी करताना ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही घाऊक बाजारातील दरवाढीनुसार विक्री दरात बदल करावा लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी काही दिवसा सण-उत्सवांचा काळ जवळ येत असताना मिठाई, फराळ आणि घरगुती पदार्थांसाठी साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दर आणखी वाढले तर त्याचा थेट भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. साखरेच्या वाढत्या दरावर शासनाने तातडीने लक्ष घालून बाजारपेठेतील दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
गोडवा देणारी साखरच आता सर्वसामान्यांच्या संसारात महागाईची ‘कडू चव’ निर्माण करू लागली आहे. साखरेचे दर नेमके का वाढले हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.








