नागपूर :- बहुजन समाज पक्षाचे (बसपा) माजी जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे यांची आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सोमवार, २४ ऑगस्ट रोजी आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित पक्षाच्या महाराष्ट्र समीक्षा बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीला आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, महाराष्ट्र पश्चिम विभागाचे अध्यक्ष उमेश हिवराडे, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष नागदेवते तसेच जे.बी. रामटेके यांच्यासह महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. यावेळी तामगाडगे यांचा पुष्पहार व निळा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. ओपुल तामगाडगे यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी बसपातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बसपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षप्रवेशासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी बसपाच्या राजकीय विचारांपासून दूर जात फुले- शाहू-आंबेडकर आणि कांशीराम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तामगाडगे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर आज नागपुरात झालेल्या महाराष्ट्र समीक्षा बैठकीत अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नागपुरातील पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी तामगाडगे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. यामध्ये आशिष निस्वादे, सुरज पुराणिक, विशाल बनसोड, बादल बनसोड, प्रतीक धारगावे, अजय चव्हाण, गुड्डू गडपायले, अनुप देशभ्रतार, अश्विन पाटील, राहुल दामोदर, झब्बु तामगाडगे, अतिश शंभरकर, राजू मेश्राम, जुगनू डांगरे, रोशन ठवरे, दीक्षा चौरे, हर्षानंद तामगाडगे, रवी पाटील, जामीनकर, नील वाघमारे, जावेद खान, फैज अन्सारी, सुशील मांडवकर, वैभव सोनटक्के, दर्शन तामगाडगे, दीपक पाटील, अजय गायकवाड, निखिल ढेंगरे, विकी वानखेडे, श्रावण रोडगे, गोलू नागफासे, अश्विन सोनटक्के आदींचा समावेश आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर ओपुल तामगाडगे यांनी नागपूर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच सामाजिक न्याय, बहुजन समाजाचे प्रश्न आणि फुले- शाहू- आंबेडकर-कांशीराम यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे यांची आजाद समाज पार्टीच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती









