spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

· रोजगार हिरावून घेणारे नव्हे, रोजगार देणारे शासन; अफवांवर विश्वास ठेवू नका

· मराठी शिकण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी

· मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार

मुंबई :- महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या 105 दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे 1 लाख 65 हजार 800 रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेस कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण या उपक्रमाला रिक्षा-टॅक्सी चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीचा आदर राखण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

परिवहन विभागाने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या भावनेतून राबविला आहे. मात्र, परिवहन विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कोणी काम करत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे ही विभागाची जबाबदारी आहे, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा विभागांतर्गत राबविण्यात येणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा घेण्यास कामागार नेते शशांक राव यांनीही सहमती दर्शविली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. या प्रक्रियेत संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबनाची कारवाई होऊ शकते; मात्र या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी शेवटी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.