– रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला पूर; जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे नागरिकांना आवाहन
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी इनसाइडर न्युज टुडे
नवेगाव बांध :- नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. नेपाळमध्ये गेलेले पर्यटक पूरस्थितीमुळे अडकले असतील किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
नेपाळमधील पूरस्थितीमुळे विविध भागांत नागरिक तसेच पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक समन्वय साधण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे.
अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो देणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच पुढील मदत व समन्वयासाठी प्रशासनाला कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. नेपाळमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या क्रमांकांवर साधा संपर्क
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया
☎️ 07182-230196
☎️ 1077 — टोल फ्री (BSNL)
📱 9404 991599 — WhatsApp





