खापा, वार्ताहर :- खापा नगरपरिषदेत होणाऱ्या आगामी सभेचे कामकाज नागरिकांसमोर पारदर्शक पद्धतीने यावे, यासाठी काँग्रेसच्या नगरसेवक व नगरसेविकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आगामी नगरपरिषद सभेचे लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
नगरपरिषद सभेमध्ये शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे या सभेचे थेट रेकॉर्डिंग झाल्यास सभेतील चर्चा, निर्णयप्रक्रिया आणि नगरपरिषदेचा कारभार नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येईल. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण होऊन नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होईल, अशी भूमिका काँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांनी निवेदनातून मांडली.
“नगरपरिषदेचा कारभार हा जनतेशी निगडित असून, जनतेच्या पैशातून विविध विकासकामे केली जातात. त्यामुळे सभेतील कामकाज नागरिकांना माहिती होणे हा पारदर्शक प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. लाईव्ह रेकॉर्डिंगमुळे सभेत कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि कोणते निर्णय घेतले जातात, हे नागरिकांना थेट पाहता येईल,” असे नगरसेवकांनी सांगितले.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने सदर मागणीचा सकारात्मक विचार करून आगामी सभेचे लाईव्ह रेकॉर्डिंग करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी गटनेता तथा नगरसेवक नामदेव गजभिये, छगन कवळे, मिलिंद बुरडे, आशिष ढाले, संजय सोनकुसळे, गणेश आके तसेच नगरसेविका कविता धराळे, वैशाली लाड, मनोरमा श्रियाम, प्रेमिला बोकडे, लिला बागडे आदी उपस्थित होते.



