अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात मनपाची नोटीस कार्यवाही

0
16

– मनपाद्वारे सक्करदरा बाजार व शांतीनगर परिसरात अतिक्रमणविरोधी जप्तीची कारवाई.

नागपूर :-  महापौर निता ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने धडक कार्यवाही करीत शुक्रवार (ता. ४) रोजी विविध आस्थापनांना नोटीस दिले. यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन अंतर्गत परिसरातील दोन आस्थापनेवर नोटीस बजाविण्यात आली असून अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर व ठेल्यांवर कारवाई करण्यात आली तर, सतरंजीपुरा झोनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत दुकाने व ठेल्यांवर कारवाई करण्यात आली.

महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मॉल, दुकाने व ठेले या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन अंतर्गत सक्करदरा बाजार परिसरांतील अवैध बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यानुसार येथील अतिक्रमण करणाऱ्या मे. सत्यम मॉल व मे. मनोज मेटल्स या आस्थापनांना संबंधित कार्यवाही करून नोटीस देण्यात आले आहे. तसेच परिसरात अतिक्रमण करणाऱ्या व पादचारी मार्गावरीळ ठेल्यांवर कारवाई करत ५ ठेले जप्त करण्यात आले आहे.

सतरंजीपुरा झोन : सतरंजीपुरा झोन अंतर्गत शांतीनगर घाट चौक ते युनिव्हर्सल चौक या परिसरात पादचारी रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या ठेल्यावर कारवाई करत ठेले जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पादचारी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.