– लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
– डाकघर उघडताच उडते झुंबड
उत्तम पराते, बेला :- जिल्हा व तालुक्याच्या टोकावर असणाऱ्या बेला या महत्वपूर्ण,मोठ्या गावात पत्रव्यवहार, गुंतवणूक व आर्थिक उलाढालही मोठी आहे. केंद्र शासनाकडून येथील उप डाकघराला दहा, पंधरा वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली. मात्र,अजूनपर्यंत येथे उप डाकघर झाले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याची गावात चर्चा आहे.
ब्रिटिश काळात येथे खातेबाह्य उप डाकघर(EDSO) होते. त्यामुळे व्यवहार थेट नागपूर सोबत व्हायचा. इसवी सन २००९-१० मध्ये केंद्र शासनाने ते बंद केले व बेला कार्यालयाला निम्न दर्जाचे शाखा डाकघर करण्यात आले. तेव्हापासून येथील पत्र व इतर व्यवहार बोरी उप डाकघरामार्फत होतो.तेथील व्यापक व व्यस्त कामकाजामुळे सेवेत विलंब होतो. त्यामध्ये बेला व परिसरातील ग्राहकांचा मनस्ताप होतो. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अंशकालीन येथे व्यवहार होतो. अपुऱ्या सोयी सुविधा व मनुष्यबळाने कामे रेंगाळतात. त्यामुळे कार्यालय उघडताच ग्राहकांची डाकघरात झुंबड उडते.
डाकसेविका आहे ‘ प्रभारी पोस्टमास्तर ‘
बेला येथील देवराव नरड यांच्याकडे पोस्टमास्तर पदाचे कामकाज होते.अंदाजे बारा महिन्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.तेव्हापासून कार्यरत डाकसेविकेकडे पोस्टमास्टर पदाचा प्रभार आहे.खेड्यापाड्यातील पत्र वाटप करून डाकघर चालवणे त्यांना अवघड होते. येथे पोस्टमास्तरचे पदभरती करणे नितांत गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
बेला येथे उपडाकघर सुरू करण्यासाठी इमारत अथवा कार्यालय उपलब्ध करून द्यावे.असे पत्र टपाल विभागाचे वरिष्ठांनी अंदाजे सात-आठ महिन्यापूर्वीला बेला ग्रामपंचायतीला दिले.मात्र,त्यावर सरपंच व ग्रामपंचायतीने कोणतीच कारवाई केली नाही.त्यामुळे उप डाकघर सुरू होण्यास विलंब होत आहे.अशी माहिती संबंधित अधिकारी यांचेकडून मिळाली.ग्रामपंचायतचे दुर्लक्षितपणामुळे वरिष्ठांना अखेर भाड्याची इमारत शोधावी लागत आहे. ती सुद्धा अद्याप मिळाली नाही.त्यामुळे बेला येथील उपडाकघर अधांतरी झाले आहे.
लहानशा दहा बाय दहा फूट आकाराच्या शाखा डाकघरातून बँकिंग व्यवहार, मुदत व आवर्त ठेव, सुकन्या,बचत, ग्रामीण डाक जीवन विमा, आरडी खाते, लाडक्या बहिणींचे मानधन वाटप, डाक थैली आणणे व पाठवणे तसेच इतर बरेच मोठे दैनंदिन कामकाज चालते. कार्यरत ३ कर्मचाऱ्यांना अवघ्या ३ तासात कामकाज उरकावे लागते आणि पत्र वाटप सुद्धा करावे लागते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची दमछाक होते.
– छतावर हिरवे गवत
डाकघराच्या छतावरील टिनपत्रे गंजले असून त्यातून पावसाळ्यात पाणी गळते. समोर कडुलिंबाचे झाड आहे. त्याचा पालापाचोळा,फांद्या व साचलेली धूळ टाकलेल्या ताडपत्रीवर पडते. त्यातून छतावर हिरवे गवत निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया – सुविधा नसल्यामुळे खातेदारांची मासिक आरडीची रक्कम मला व इतर महिला अभिकर्त्यांना बुटीबोरीचे उप डाकघरात नेऊन भरावी लागते. त्यामध्ये जोखीम असते. शिवाय ये जा करावी लागते. त्यामध्ये असुरक्षितता व भीती वाटते. शासनाने येथे उपडाकघर सुरू केले तर अभीकर्त्यांवर संकटाची वेळ येणार नाही. याची वरिष्ठांनी दखल घ्यावी.
रजनी संजय लामपुसे
अभिकर्ता, महिला प्रधान क्षेत्रीय अल्पबचत योजना
प्रतिक्रिया – उप डाकघरासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्याचे संबंधितांना तोंडी सांगितले आहे. तसे पत्रही देण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या पटांगणात वाचनालयाचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे जागा उपलब्ध करून देणे शक्य नाही.
साहेबराव शंभरकर ग्रामपंचायत अधिकारी,बेला.





