spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी

पुणे :- पुणे पोलीस दलात बनावट क्रीडा प्रमाणपत्रे सादर करून नोकरी लाटल्याचा एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांची बोगस प्रमाणपत्रे दाखवून तब्बल 19 उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा लाभ घेत पोलीस दलात नोकरी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने धडक कारवाई करत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक केली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ही बनावट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून तब्बल 3 ते 5 लाख रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांशिवाय परभणी जिल्हा संघटक कल्याण मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांद पाशा शेख यांच्यासह संघटनेच्या इतर काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये क्रीडा विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत.

जिल्ह्यांची जुनी नावे ठरली तपासाचा मुख्य दुवा

हा सर्व घोटाळा उघडकीस आणण्यात एका तांत्रिक चुकीने मोठी भूमिका बजावली. आरोपींनी 2016 आणि 2017 या वर्षांत विविध जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा पार पडल्याचे दाखवून बनावट प्रमाणपत्रे तयार केली होती. मात्र, ही प्रमाणपत्रे तयार करताना सध्याच्या ‘धाराशिव’ जिल्ह्याचा उल्लेख ‘उस्मानाबाद आणि ‘छत्रपती संभाजीनगर’जिल्ह्याचा उल्लेख ‘औरंगाबाद’ असा करण्यात आला होता. वास्तविक या दोन्ही जिल्ह्यांची नावे 2023 मध्ये बदलण्यात आली आहेत. अलिकडच्या काळात जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर जुन्या नावांचा वापर झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि हा संपूर्ण गैरप्रकार उघड झाला. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव व्यतिरिक्त जळगाव, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि गोंदिया या जिल्हा संघटनांकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रेही बनावट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

उमेदवारांवर टांगती तलवार; इतर सरकारी खात्यांचाही तपास सुरू

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या 19 उमेदवारांपैकी 9 उमेदवार सध्या पोलीस प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. आता या सर्व उमेदवारांवर काय प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ पोलीस दलच नव्हे, तर इतर सरकारी विभागांमध्येही अशीच बोगस प्रमाणपत्रे सादर करून अनेक जण सेवेत रुजू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.