– आयआयएम नागपूरच्या मीडिया कॉन्क्लेव्हचा समारोप
नागपूर :- ‘तरुणांचा देश’ म्हणून भारत ओळखला जात असून आजचा युवा आपल्या देशाची खरी ताकद आहे. या युवकांनी उच्च बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे व्यक्त केला.
येथील भारतीय प्रबंध संस्थानमध्ये (आयआयएम) आयोजित दोन दिवसीय ‘मीडिया कॉन्क्लेव्ह २०२६’ चा समारोप आज झाला. त्यावेळी मंत्री शेलार बोलत होते. कॉन्क्लेव्हच्या विविध सत्रांमध्ये झालेल्या चर्चेतील विचारांचा आढावा घेत ॲड. शेलार यांनी संपूर्ण आयोजनाचा आशयसंपन्न समारोप केला.
शेलार म्हणाले, संपूर्ण जग आज भारताकडे भविष्यातील ऊर्जा, प्रतिभा आणि विकासाचे केंद्र म्हणून पाहत आहे. युवकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सजग, चिकित्सक आणि नीतिमूल्यांशी बांधील राहणे आवश्यक आहे.

जगात सर्वोत्तम बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे. मात्र, आपल्या सामर्थ्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे. त्यासाठी संस्कृती, माध्यमे, तंत्रज्ञान आणि नेतृत्व या तत्त्वाचे आचरण करणे गरजेचे आहे.
‘मीडिया, लीडरशिप अँड द न्यू वर्ल्ड ऑर्डर’ हा कॉन्क्लेव्हचा विषय अत्यंत समर्पक आणि काळाची गरज असल्याचे नमूद करून त्यांनी युवा पिढीला जबाबदार संवादाची चार सूत्रे दिली. केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी नव्हे, तर परस्परांविषयी समज निर्माण करण्यासाठी संवाद साधा. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी तो नीट समजून घ्या. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी त्यामागील मानवी उद्देशाचा विचार करा. असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
माध्यमे, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या तिन्हींना जोडणारा समान धागा म्हणजे नीतिमूल्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्याचा केंद्रबिंदू मानवकल्याणाची जबाबदारी आणि सामाजिक हित हाच असला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारप्राप्त उद्योजक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते अमित वाईकर यांनी ‘बियाँड बॉर्डर्स : हाऊ इंडिया कम्युनिकेट्स विथ द वर्ल्ड’ या विषयावर बीजभाषण केले. आजचा युवा भारत देशाचा सर्वांत प्रभावी जागतिक संवादक आहे. भारत तुमच्या माध्यमातून जगाशी संवाद साधतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवाहक बनण्याचे आवाहन केले.

भारताची ओळख केवळ विविध रंग, संगीत, साहित्य, भाषा आणि संस्कृतीपुरती मर्यादित नाही. असे वाईकर म्हणाले. चीनमधील आपल्या वास्तव्यात आयोजित केलेल्या सार्वजनिक रक्तदान शिबिराचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. निःस्वार्थ सेवा आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास हीच भारताची खरी जागतिक ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, आयआयएम नागपूर केवळ भविष्यासाठी सक्षम मनुष्यबळ घडवत नसून महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारसोबत सक्रियपणे काम करीत आहे. या संस्थेने विविध शासकीय विभाग आणि संस्थांसोबत केलेले सामंजस्य करार, लोकाभिमुख प्रकल्प तसेच ज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून समाजासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी, उद्योग प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या ‘मीडिया कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये माध्यमे, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, सार्वजनिक संवाद, विकास पत्रकारिता, आरोग्यविषयक जनजागृती, हिंदी माध्यमे आणि भारताची जागतिक प्रतिमा अशा विविध विषयांवर व्यापक मंथन झाले.





