spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मेडिकल कॉलेजमध्ये रुग्ण व नातेवाईकांच्या गैरसोयींबाबत डीन यांना निवेदन

– वॉर्डबॉय व प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवेत सुधारणा करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची मागणी

नागपूर :- नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. रुग्णालयातील वॉर्डबॉय तसेच संबंधित प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवेत आवश्यक सुधारणा करून रुग्णांना योग्य सहकार्य मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल, नागपूर शहरच्या वतीने मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राज गजभिये यांना निवेदन देण्यात आले.

योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील यांच्या आयोजनात आणि नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष संतोष भुजाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ. राज गजभिये यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या डीन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांना वेळेवर आणि योग्य मार्गदर्शन मिळणे, वॉर्डबॉय तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडणे, रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागणे आणि रुग्णालयातील विविध विभागांमध्ये समन्वयाने सेवा देणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. विशेषतः गंभीर अवस्थेतील रुग्ण तसेच वृद्ध, महिला आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रुग्णालयीन प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना आवश्यक सेवा मिळण्याची व्यवस्था, वॉर्डमधील कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती व मार्गदर्शन तसेच तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यसेवेचे केंद्र असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलतेने सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ‘रुग्णसेवा हीच खरी जनसेवा’ या भावनेतून प्रशासनाने रुग्णांच्या अडचणींकडे पाहावे आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देऊन व्यवस्थेत सुधारणा करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आशिष खुबळकर, भारत ठाकरे, तुषार ढबाळे, मनोज जरेल, गोविंदराव सोमकुवर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाने निवेदनातील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन रुग्णसेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.