– महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सोहळ्याची सांगता
– श्रावण क्वीन, फुलराणी, ‘रंग माझा हिरवा’सह विविध स्पर्धांनी वाढविली उत्सवाची रंगत
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी आनंदाने जगता यावेत, मैत्रिणींसोबत हसता-खेळता यावे तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने ‘महापौर श्रावण उत्सव सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये संपूर्ण श्रावण महिन्यात उत्साहात पार पडला. या उपक्रमाची सांगता (ता.८) जरीपटका येथील दयानंद पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
श्रावण महिन्याची पारंपरिक संस्कृती, वेशभूषा, गीत-संगीत आणि विविध मनोरंजक स्पर्धांनी या उत्सवाला विशेष रंगत आणली. सहाही विधानसभा क्षेत्रांत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काही महिलांनी शंकर-पार्वती, राधा-कृष्ण तसेच देवीच्या विविध रूपांची वेशभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
श्रावणातील हिरवळीची संकल्पना लक्षात घेऊन महिलांनी झाडांची पाने, फुले आणि विविध नैसर्गिक घटकांचा कल्पकतेने वापर करून आपली वेशभूषा आणि सजावट केली. लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी नृत्य स्पर्धा, फॅशन शो तसेच विविध खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सहाही विधानसभा क्षेत्रांतील उद्यानांमध्ये फुलांनी सजविलेले झोपाळे उभारण्यात आले होते. महिलांनी झोपाळ्यावर झोका घेत श्रावण गीते म्हणत सेल्फी घेत उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, महिला या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आधारस्तंभ आहेत. घर, मुलं, नोकरी-व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना अनेकदा त्या स्वतःच्या आनंदासाठी वेळ देऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक सुंदर झलक फुलावी, त्यांच्या कलागुणांना मुक्तपणे वाव मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने ‘महापौर श्रावण उत्सव’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या उपक्रमामागील संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याचा आनंद आहे, असे महिलांच्या मिळालेल्या या सहकार्याचे त्यांनी स्वागत केले. तसेच आयोजक क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड व संजोयक टीमचे कौतुक करत थाप दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे, मंगळवारी झोन सभापती सीमा डवरे, नगरसेविका सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, निरंजना पाटील, रेखा पाटील, माजी महापौर संदीप जाधव, माजी नगरसेविका प्रगती पाटील, माजी नगरसेविका नेहा निकोसे, क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या संपूर्ण उपक्रमाला उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड बोलतांना म्हणाल्या, श्रावण हा केवळ धार्मिक विधी आणि उपवासाचा महिना नसून, भारतीय संस्कृतीतील उत्सवप्रियता, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा काळ असल्याचे सांगितले. कुटुंब, मुलं तसेच नोकरी-व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध स्पर्धांनी रंगली श्रावणाची रंगत
महापौर श्रावण उत्सवामध्ये ‘श्रावण क्वीन’, ‘फुल राणी’, ‘तुझी माझी जोडी’ आणि ‘रंग माझा हिरवा’ यांसारख्या विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच श्रावण गीते, नृत्य, विविध खेळ, फॅशन शो आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांचा पैठणी साडी आणि डिनर सेट देऊन गौरव करण्यात आला. सहाही विधानसभा क्षेत्रांत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचे निवेदन प्रमय लोखंडे यांनी केले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आनंदी सहभाग यामुळे ‘महापौर श्रावण उत्सव’ हा उपक्रम संस्मरणीय ठरला.





