हंसराज,भंडारा :- जिल्ह्यातील वृद्ध कलावंत मानधन निवड समितीमध्ये कलावंतांऐवजी राजकीय व्यक्तींची वर्णी लावल्याच्या निषेधार्थ अमर कला सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी पुकारलेल्या उपोषणाची प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आमदार नानाभाऊ पटोले आणि जिल्हाधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, खऱ्या कलावंतांनाच समितीत स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. याकरिता जिल्ह्यात एक निवड समिती गठीत केली जाते, ज्यामध्ये १० अशासकीय सदस्य हे कलावंतांमधून नियुक्त करणे अनिवार्य आहे. मात्र, नुकत्याच तयार झालेल्या नवीन समितीमध्ये केवळ एक-दोन सदस्य वगळता संपूर्ण राजकीय व्यक्तींचा भरणा करण्यात आला होता. या अन्यायाविरोधात अमर कला सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी २४ ऑगस्ट २०२६ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.
उपोषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समितीतील दहाही सदस्यांची पडताळणी केली असता, त्यातील ३ ते ४ सदस्य हे कलाकार नसल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नाना पटोले व जिल्हाधिकारी यांनी श्रीकांत नागदेवे यांना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी नानाभाऊ पटोले यांनी कलावंतांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत, निवड समितीमध्ये केवळ तज्ज्ञ कलावंतांनाच स्थान देण्यात यावे, अशी सूचना केली. तसेच कोणत्याही कलावंतावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
सध्या जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या नवीन आदेशाची वाट पाहत असून, तोपर्यंत नवीन समिती स्थापन करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ज्येष्ठ व तज्ज्ञ लोककलावंतांना नवीन समितीत स्थान न मिळाल्यास, जिल्ह्यातील समस्त कलावंत पुन्हा एकदा सामूहिकरीत्या बेमुदत आमरण उपोषण करतील, असा इशारा श्रीकांत नागदेवे यांनी दिला आहे.
या बैठकीप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, मनोज खोब्रागडे, लोकशाहीर अंबादास नागदेवे, गणेश मेश्राम, युगंधर बारसागडे, युवराज मोहतुरे, रविकांत नागदेवे, गंगाधरजी धोत्रे तसेच जिल्ह्यातील अनेक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील कलावंतांचे आता पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.





