खापा, वार्ताहर :- शेतकऱ्यांचा जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण खापा शहरात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात आयोजित पोळ्यात शहरातील अनेक आकर्षक सजविलेल्या बैलजोड्यांनी सहभाग घेतला. यावेळी शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता, तर लहान मुलांची खेळणी व फुगे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती.
पोळा भरण्याच्या वेळी परिसर ‘हर हर महादेव’ तसेच ‘घेऊन जा गे मारबत’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. पुरातन परंपरेनुसार पाटील, राजेश बन्सोड व प्रणव बन्सोड यांनी ढोल-ताशा आणि बँडच्या गजरात सजविलेल्या बैलजोड्या घेऊन पोळ्यात सहभाग घेतला. हनुमान मंदिरात पूजा-अर्चना केल्यानंतर पोळा फुटला.
नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या विशेष सहकार्याने शहरात प्रथमच अशा स्वरूपात ऐतिहासिक बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. पोळ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा दुपट्टे व टोपी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा आणि आकर्षक बैल सजावटीसाठी देवानंद बोकडे, तुषार जानुसकर व यशवंत ढोंगे पाटील यांच्या वतीने डबल बॅटरी इलेक्ट्रिक फवारा पंप व रोख पारितोषिक देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, भवानी माता मंदिर चौकात काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद बुरडे व आशिष ढाले मित्र परिवाराच्या वतीने पोळ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना टोपी व दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत काळे उपस्थित होते. यावेळी नगर परिषद अध्यक्ष पीयूष बुरडे, उपनगराध्यक्ष सुनील पाहुणे, सतीश लांजेवार, पुंडलिक घाटोळे, मुन्ना शर्मा, किशोर आष्टनकर, राहुल निर्मल, रूमान शेख यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





