खापा, वार्ताहर :- पारंपरिक सणाला सर्जनशीलतेची जोड देत गौरव शत्रुघन खोब्रागडे (वय ९ वर्षे, इयत्ता चौथी), लिखिता शत्रुघन खोब्रागडे (वय ११ वर्षे, इयत्ता सहावी) आणि प्रज्वल नंदनवार यांनी टाकाऊ साहित्यापासून आकर्षक नंदी साकारत तान्हा पोळा उत्साहात साजरा केला.
नंदी तयार करण्यासाठी सर्वप्रथम उपलब्ध असलेल्या टाकाऊ कागद व खरड्यांपासून नंदीचा आकार तयार करण्यात आला. त्यानंतर हा आकार व्यवस्थित मजबूत करून त्याला नंदीचे डोके, शिंगे, कान, पाय व शरीराचा योग्य आकार देण्यात आला. तयार केलेल्या सांगाड्यावर कागदाचे विविध थर लावून त्याला आवश्यक आकार व मजबुती देण्यात आली. डिंकाच्या साहाय्याने कागद व इतर साहित्य घट्ट चिकटवून नंदीची प्रतिकृती सुबक करण्यात आली.
नंदी अधिक आकर्षक दिसावा यासाठी बॉर्डर पट्टी, सेंच्युरी पेपर आदी साहित्याचा वापर करून त्याची सजावट करण्यात आली. उपलब्ध टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करत रंगसंगती व सजावटीच्या माध्यमातून नंदीला आकर्षक स्वरूप देण्यात आले. विशेष म्हणजे, बाजारातून महागडे साहित्य न आणता घरातील व परिसरातील वापरात नसलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करून ही कलाकृती साकारण्यात आली.
या उपक्रमातून मुलांची कल्पकता, सर्जनशीलता, कलाकौशल्य आणि पर्यावरणपूरक विचारसरणी दिसून आली. टाकाऊ वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर करून सुंदर कलाकृती तयार करता येते, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. पारंपरिक तान्हा पोळ्याची संस्कृती जपत पर्यावरणपूरक आणि सर्जनशील पद्धतीने सण साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.





