– चौक–कर्जत दुपदरीकरणासाठी 497 कोटी; मुकुटबन–गडचांदूर नव्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली असून, भारतीय रेल्वेने राज्यातील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी 990 कोटी मंजुर केले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या चौक–कर्जत 10.86 किमी मार्गाच्या दुपदरीकरणासाठी 497 कोटी, तर दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत मुकुटबन (आदिलाबाद)–गडचांदूर 38.21 किमी नव्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
चौक–कर्जत दुपदरीकरणामुळे प्रवासी व मालवाहतुकीची क्षमतेत वाढ
पनवेल–चौक–कर्जत मार्गावरील सध्या एकेरी असलेल्या चौक–कर्जत विभागाचे दुपदरीकरण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रत्येक दिशेने दररोज पाच अतिरिक्त प्रवासी गाड्या चालविण्याची क्षमता निर्माण होणार असून, दरवर्षी 18.35 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळता येणार आहे. मालगाड्यांचा विलंब आणि थांबे कमी करण्यासही यामुळे मदत होणार आहे.
मुकुटबन–गडचांदूर मार्गामुळे उद्योग व खनिज वाहतुकीला बळ
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या औद्योगिक व खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38.21 किमी नव्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गामुळे सिमेंट प्रकल्प, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना अधिक सक्षम रेल्वे जोडणी मिळणार आहे.
नव्या मार्गामुळे प्रवासाचे अंतर, वाहतूक वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होणार असून वर्धा–माणिकगड विभागावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशांना दररोज दोन-दोन मेमू गाड्या चालविण्याची तसेच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी रेल्वे जोडणी
मुकुटबन–गडचांदूर नवा रेल्वे मार्ग कोळसा व सिमेंट उद्योगसमूहांना माजरी–नांदेड रेल्वे मार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध शहरांकडे कोळसा, सिमेंट आणि इतर मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल.. तसेच बल्हारशाह–नागपूर या गर्दीच्या हाय-डेंसिटी मार्गावरील अवलंबित्व कमी करण्यास पर्यायी मार्गाची मदत होणार आहे. यवतमाळ व चंद्रपूरच्या तुलनेने कमी रेल्वे जोडणी असलेल्या भागांनाही याचा लाभ होणार आहे.
चौक–कर्जत दुपदरीकरण आणि मुकुटबन–गडचांदूर नवा रेल्वे मार्ग हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातील प्रवासी सुविधा, मालवाहतूक क्षमता आणि औद्योगिक संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.





