spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा–सावनेर व खापा–पाटणसावंगी रेल्वे क्रॉसिंगवर ROB उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

– गती शक्ती युनिटकडून प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात; शहरवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मिळाली चालना

खापा, वार्ताहर :- खापा शहरातून सावनेर तसेच पाटणसावंगीच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे ये-जा करताना फाटक बंद राहिल्यामुळे नागरिक व वाहनचालकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचा वेळ वाया जात असून, आपातकालीन सेवांनाही विलंबाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारण्यात यावा, अशी खापावासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला आता प्रत्यक्ष कार्यवाहीची दिशा मिळाली असून प्रस्तावित ROB प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

खापा नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे यांनी शहरवासीयांची ही मागणी संबंधित वरिष्ठ स्तरावर मांडत सातत्याने पाठपुरावा केला. आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या महत्त्वपूर्ण मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्यानंतर रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रस्तावासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. सावनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांकडून प्राप्त पत्रानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), नागपूर विभागांतर्गत गती शक्ती युनिटमार्फत प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ROB उभारणीमुळे रेल्वे फाटक बंद असताना निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता असून, वाहनचालक व नागरिकांचा वेळ वाचण्याबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना सुरळीत मार्ग उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीकडे खापा शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा असून, ROB उभारणीमुळे खापा शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांच्या मागणीला मिळाली चालना

“खापा शहरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दिशेने जात असल्याचे समाधान आहे. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी सहकार्य करणारे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार,” असे नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.