कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे डॉ. अभिजीत चौधंरी यांचे निर्देश
नागपूर, ता. १२ : नागपूर शहरातील पोलिस लाईन टाकळी आणि गोरेवाडा येथे मोठ्या गणपती मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन जलकुंड तयार करण्यात आले आहे. या कृत्रिम विसर्जन जलकुंडची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.११) पाहणी केली. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, सुनील उईके, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपअभियंता संदीप लोखंडे, उपअभियंता राजीव गौतम, प्रशांत वाघमारे, कंत्राटदार एस.एस. पाटील आदीसह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कृत्रिम विसर्जन जलकुंड तयार करण्यात आले आहे. यात पोलिस लाईन टाकळी तलाव आणि गोरेवाडा विसर्जन ठिकाण यांचा समावेश आहे. पोलिस लाईन टाकळी येथील कृत्रिम विसर्जन जलकुंड ही 24 बाय 10 मीटर अशी लांब तसेच साडे चार मीटर अशी खोल तयार करण्यात आली आहे. या विसर्जन जलकुंडमध्ये मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित करता येणार आहे. या जलकुंड परिसरात सरंक्षण भिंत, हिरवळ विषयक कामे, स्वच्छतागह, सिक्युरिटी व स्टोअर रुम, पाईप कलव्हर्ट, विद्युतीकरण व प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रकल्पाअंतर्गत विसर्जन कुंडाचे विसर्जनाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक कामे पूर्ण झाली आहे. तर येथील पंप हाऊस, स्टोअर रुम व सिक्युरीटी रुमची कामे अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, यंदा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनसाठी गोरेवाडा, कोराडी, कच्छीवीसा येथे सोय करण्यात आली आहे. तर सोनेगाव, गांधीबाग तलाव परिसरासह विविध ४१५ ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केले जाणार आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गणपती विसर्जनच्या दृष्टीकोनातून पोलिस लाईन टाकळी येथील कृत्रिम जलकुंड येथे गणपतीचे विसर्जनच्या वेळी होणारे एन्ट्री आणि एक्झीट, त्याचबरोबर विसर्जन जलकुंड मधून पाणी निकासाच्या स्थितीबाबत माहिती घेतली. तसेच गणेश चतुर्थी पूर्वी इतर शिल्लक राहिलेली कामे अधिक गतीने करण्याचे निर्देश दिले. कोराडी विसर्जन जलकुंड केंद्राप्रमाणे पोलिस लाईन टाकळीतील विसर्जन जलकुंडात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
त्याचसोबतच मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी गोरेवाडा येथील कृत्रिम विसर्जन जलकुंड पाहणी केली. येथे शहरातील मोठ्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. नागपूर येथील गोरेवाडा येथे भव्य कृत्रिम विसर्जन कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे. जे 32 बाय 18 मीटर असून 6.5 मीटर खोल आहे, यात मोठ्या आकाराच्या मूतींचे विसर्जन करता येणार आहे. टाकीला अडथळेविरहित बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र सक्शन विहिरीचा आधार देण्यात आला आहे. याशिवाय क्रेन, क्लीनिंग मशिन्स आणि निर्माल्य डिस्पोजल ट्रकसाठी 15 मीटर अभिसरण मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे विसर्जनात व्यत्यय येणार नाही. याशिवाय मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनासाठी 17 मीटर रुंद रस्ता तयार करण्यात आला आहे. याचबरोबर अतिथीकरिता विश्रांती कक्ष, पाहुण्यांसाठी स्टेज तयार करण्यात आले आहे. टाकीतील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ई.टी.पी. पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे. ज्यामुळे त्याची थेट जमिनीवर विल्हेवाट लावली जाणार नाही. यामुळे पेंटच्या घातक घटकांपासून मातीचे संरक्षण होणार आहे. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गोरेवाडा कृत्रिम विसर्जन टँक परिसराचा चांगला विकास करावा, उर्वरीत जमीनीवर जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक तयार करावे, दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टँक तयार करण्यात यावे याबाबत आवश्यक निर्देश दिले.








