नागपूर १२ : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर, जेव्हा शहरभरात बहीण-भावांचे प्रेम साजरे केले जात होते, तेव्हा काही चोरट्यांनी हीच वेळ साधून नागपूरमधील चार वेगवेगळ्या भागांतील बंद घरे फोडून २० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.
न्यू डायमंड नगर, नंदनवन पोलीस ठाणे
फरीद सचिन हटवार (३२), खाजगी बँकेत व्यवस्थापक आहेत. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता कुटुंबासह भावाकडे बहादूर येथे रक्षाबंधनासाठी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ८.५४ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
शताब्दी नगर, अजनी पोलीस ठाणे
सुरेश लखोटे, फेब्रिकेशन व्यवसायिक, हे ९ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासह खापरी पुनर्वसन येथे गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घरातून ७०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये दागिने व रोख रक्कम यांचा समावेश आहे.
अंगुली माल नगर, कपिल नगर पोलीस ठाणे
उमाशंकर विश्वकर्मा, व्यवसायाने इलेक्ट्रिशियन, रक्षाबंधनासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गेले होते. १० ऑगस्टला सकाळी ६ वाजता शेजाऱ्याच्या फोनवरून दरवाजा उघडा असल्याचे समजल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. तपासात ६.८४ लाख रुपयांचा ऐवज, ज्यात दागिने व ३.४ लाखांची रोख रक्कम होती, चोरीला गेल्याचे उघड झाले.
चैतन्येश्वर नगर, वाठोडा पोलीस ठाणे
मनोज माणिकराव नाकाडे, खाजगी व्यवसाय करणारे, ९ ऑगस्टच्या रात्री १०.३० वाजता कुटुंबासह काटोल येथे गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून ३.४७ लाख रुपयांचा माल लंपास केला. विशेष म्हणजे, घरात सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही चोरट्यांनी डीव्हीआर यंत्रही चोरून नेले. या चारही घटनांमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, नागपूर पोलिसांनी घटनास्थळांजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी घर बंद करताना आवश्यक ती सुरक्षा खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
@filephoto








