नागपूर :- गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बार असोसिएशन, नागपूरच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ॲड. मुकुंद एल.धुनिसिंगानी, उपाध्यक्षपदी सीए रितेश आर. मेहता, सचिवपदी सीए प्रीतम बत्रा, सहसचिवपदी सीए गर्वित जी. पालिवाल, तर कोषाध्यक्षपदी सीए दीपक रहांगडाले यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अनिल बी. देशपांडे, सीए जय एम. पोपटांनी, सीए आशिष एम. मुंधडा आणि टीपी. फरहाद जिवानी यांची निवड करण्यात आली. तसेच वाढदिवस उत्सवाचे प्रभारी म्हणून टीपी. तेनेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जीएसटी बार असोसिएशनच्या माध्यमातून वस्तू व सेवा करासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर नियमितपणे अभ्यास मंडळे (स्टडी सर्कल), गटचर्चा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. जीएसटी तसेच अन्य अप्रत्यक्ष कर कायद्यांच्या अंमलबजावणीदरम्यान कर व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत केंद्र व राज्य जीएसटी विभागाकडे वेळोवेळी निवेदने व प्रतिनिधित्व करण्यात येते.
या संघटनेमध्ये सनदी लेखापाल (सीए), अधिवक्ते तसेच कर सल्लागार व कर व्यवसायिकांचा समावेश आहे. कर क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी या संघटनेतून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला दिशा दिली आहे. संघटनेने व्यावसायिक क्षेत्रासोबतच व्यापारी, उद्योजक, शासकीय यंत्रणा आणि समाजाच्या व्यापक हितासाठी सातत्याने योगदान दिले आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बार असोसिएशनने आपल्या कार्याचा ७१ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून, कर क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडचणी सोडविणे, ज्ञानवृद्धी करणे आणि करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योगदान देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे.



