– तुडतुडा व खोडकिडीमुळे बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी
हंसराज,भंडारा :- पावसातील प्रदीर्घ खंडामुळे भातपिकांवर निर्माण झालेला ताण तसेच काही भागात तुडतुडा व खोडकिडीचा झालेला प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आंधळगाव मंडळातील पालडोंगरी व जाम परिसरातील शेतांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या.
आंधळगाव येथील शेतकरी शंकर मेश्राम यांच्या शेताची जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जाम येथील शेतकरी दिवाकर बोरकर यांच्या शेतालाही भेट देऊन भातपिकाची पाहणी केली. यावेळी भातपिकावर झालेला तुडतुडा व खोडकिडीचा प्रादुर्भाव, तसेच पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पिकांची सद्यस्थिती, कीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याबाबतच्या अडचणी मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करावे. आवश्यकतेनुसार नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार आवश्यक ती मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदासी, सहायक कृषी अधिकारी अक्षय बागडे, के. बी. लांजेवार, तलाठी विनोद भावे तसेच संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



