आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

0
4

मुंबई :- आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी येथे केले.

राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन सूर्यवंशी सभागृह, दादर मुंबई येथे करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आयुर्वेद उद्योजक रणजित पुराणिक, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वेंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे तसेच वैद्य, संशोधक व आयुर्वेद क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते.

आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करावे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्या ‘एम्स’ संस्थेप्रमाणे आयुर्वेद विज्ञान व संशोधनासाठी जागतिक दर्जाची संस्था निर्माण करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

विश्व आयुर्वेद परिषदेने आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत काम करावे तसेच आयुर्वेद शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी व अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

निरोगी व समृद्ध भारताच्या भविष्यासाठी आयुर्वेदाची महत्त्वपूर्ण भूमिका – केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव

आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाशी जोडून देशातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 50 बेड असलेले आयुर्वेदिक रुग्णालय निर्माण केले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संवर्धनातून आरोग्यासोबतच पर्यावरण, शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयुर्वेदाला आधुनिक वैज्ञानिक संशोधनाची जोड आवश्यक – केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक

आयुर्वेद ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून, पारंपरिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, प्रामाणिक पुरावे आणि क्लिनिकल डेटाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे आयुर्वेदाला देशाच्या तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी स्थान मिळेल, असे ऊर्जा मंत्रालय व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

आयुर्वेद शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत सक्षम शिक्षण व संशोधन संस्था उभाराव्यात. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक पद्धतीने कार्य करून रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि वैज्ञानिक पुराव्यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक  – डॉ. विनायक तायडे

आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आयुर्वेदिक उपचार पद्धतीला राष्ट्रीय उपचार पद्धतीचा दर्जा मिळावा, अशी मागणी विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे यांनी केली. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी वैद्य, संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. मधुभाई कोठारी यांना आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार, स्वप्नील पदते यांना युवा धन्वंतरी पुरस्कार तर मूलराज वडोर यांना आयुर्वेद उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.