नवमतदार नोंदणीला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करा- विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

0
5

– पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

नवी मुंबई :- नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसेच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून नाव नोंदणीच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांना भेट देऊन संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त (प्रशासन) फरोग मुकादम, १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पवन चांडक, १९० उरण विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अवी कुमार सोनवणे, तहसीलदार मीनल भामरे, जितेंद्र इंगळे, उद्धव कदम, नायब तहसीलदार संभाजी शेलार तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवमतदार नोंदणीला गती द्या

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर दिला. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात यावी. वाढवून दिलेल्या मुदतीचा, म्हणजेच १२ ऑक्टोबरपूर्वीचा कालावधी प्रभावीपणे वापरून बीएलओंनी गृहभेटींना गती द्यावी, पात्र मतदारांची आवश्यक कागदपत्रे तसेच नवमतदारांसाठी फॉर्म क्रमांक ६ संकलित करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पात्र नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन क्षेत्रीय पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

सहा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेट

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील कामोठे येथील सहा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांना विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांना मतदार नोंदणीसंदर्भातील सेवा व मार्गदर्शन अधिक सुलभतेने मिळावे, यासाठी कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून त्यामध्ये आवश्यक वाढ करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना केल्या.

न्यू इंग्लिश स्कूलमधील दहा मतदान केंद्रांची पाहणी

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील दहा मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी कार्यरत बीएलओंशी संवाद साधून मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. संबंधित बीएलओंकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या बाबींवर मार्गदर्शन केले.

पनवेल व उरण मतदारसंघातील कामकाजाचा आढावा

उपविभागीय अधिकारी कार्यालयात १८८ पनवेल आणि १९० उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.