मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ‘ट्री बँक’चे उद्घाटन
शिवाजीनगर उद्यानातून मनपाच्या उपक्रमाचा प्रारंभ
नागपूर, १३ : केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम २.०’ आणि राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने धरमपेठ झोन येथील रामनगर परिसरातील शिवाजीनगर उद्यानात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.12) ‘ट्री बँक’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांना 20 हजार वृक्षाचे ३० सप्टेंबर पर्यंत नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्त स्नेहलता कुंभार, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, मनोज गद्रे, सोनकुसरे, गुजर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी नगरसेवक संजय बंगाले, मनपाच्या ब्रँड ॲम्बेसेडर व ग्रीन्ह व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, अरुण पेठेवार यांच्यासह गांधीनगर येथील मनपाच्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग प्रामुख्याने मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्यासह नागरिकांनी उद्यानात ‘एक पेड माँ के नाम २.०’ अंतर्गत उभारलेल्या बोर्डावर अंगठ्याचे ठसे उमटविले आणि पर्यावरण सरंक्षणाची ग्वाही दिली. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नि:शुल्क झाडाचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम २.०’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत एक कोटी झाडे राज्यात लावले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दहा उद्यानात ट्री बँक तयार करण्यात आली असून, या माध्यमातून नागरिकांना २० हजार झाडांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पुढे डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, मनपा नेहमीच पर्यावरणाप्रती सजग आहे. मनपातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या झाडाचे नागरिकांनी जतन केल्यास पर्यावरण मोहिम यशस्वी होईल. पर्यावरण संरक्षणासाठी असलेला उपक्रमास नागरिकांचा मोठा सहभाग असला तर अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी करता येईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरीकांना आपले घराचे परिसरात लावण्याकरीता एक वृक्ष मोफत पुरविण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त ह्यांचेद्वारे करण्यात आले.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., यांनीही जनसहभागातून उपक्रम सरू करण्यात असल्याचे सांगत नागरिकांनी ‘एक पेड माँ के नाम २.०’ या मोहिमेत आपला सहभाग वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी माजी नगरसेवक संजय बंगाले यांनीही मनपाने सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. वृक्ष संवर्धनाकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिले असे त्यांनीही आवाहन यावेळी केले.
नागरिकांना वृक्ष लागवड व जतन करण्याची प्रेरणा मिळावी, याकरिता केंद्र शासनातर्फे ‘एक पेड माँ के नाम २.०’ आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शिवाजीनगर उद्यानासह , त्रिमुर्ती नगर उद्यान,, हनुमान नगर उद्यान, महात्मा फुले उद्यान सुयोग नगर, संत ज्ञानेश्वर उद्यान, गांधीबाग उद्यान, तुलसीनगर उद्यान, लता मंगेशकर उद्यान, डॉ. बाबासाहेब उद्यान वैशालीनगर, सखाराम मेश्राम उद्यान अशा शहरातील दहा उद्यानात ‘ट्री बँक’ तयार करण्यात आली आहे. नागरिकांना सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत या उद्यानात नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे सिरम, आंबा, आवळा, बकुळ, वड, अशोका, कडुनिंब, कदंब, जांभूळ, चिकू, पिंपळ, आवळा, वड, आरोळा सह इतर झाडांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. मनपातर्फे नागरिकांना नि:शुल्क वाटप करण्यात येणाऱ्या झाडांचा डेटा जतन केला जाणार आहे.
शिवाजीनगर उद्यानातील ट्री-बँक उद्घाटन आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी निखील साल्पेकर, संजीव काळकर, योगीता झरारीया, प्रमीला हिरडे, प्रमोद पांडे आणि वाल्मिकीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते वृक्षाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, शिवाजीनगर उद्यानात आकर्षक अशी ट्री बँक तयार करण्यात आली आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आली आहे.
नागरीकांनी वृक्ष लागवड केल्यानंतर htttp//nmcnagpur.gov.in/ekped या लिंकवर वृक्ष लागवडीचा फोटो सेल्फी अपलोड करावा.
दहा झोनमध्ये विविध उद्यानात लावण्यात आलेल्या ट्री बँकची यादी
दहा झोनमध्ये विविध उद्यानात लावण्यात आलेल्या ट्री बँकची यादी
| क्र | झोन | उद्यान |
| 1 | लक्ष्मीनगर झोन क्र. 1 | त्रिमुर्ती नगर उद्यान |
| 2 | धरमपेठ झोन क्र.2 | शिवाजीनगर उद्यान |
| 3 | हनुमाननगर झोन क्र. 3 | हनुमान नगर उद्यान |
| 4 | धंतोली झोन क्र. 4 | महात्मा फुले उद्यान सुयोग नगर |
| 5 | नेहरुनगर झोन क्र. 5 | संत ज्ञानेश्वर उद्यान |
| 6 | गांधीबाग झोन क्र. 6 | गांधीबाग उद्यान |
| 7 | सतरंजीपुरा झोन क्र. 7 | तुलसी नगर उद्यान |
| 8 | लकडगंज झोन क्र. 8 | लता मंगेशकर उद्यान |
| 9 | आशीनगर झोन क्र. 9 | डॉ. बाबासाहेब उद्यान वैशाली नगर |
| 10 | मंगळवारी झोन क्र. 10 | सखाराम मेश्राम उद्यान |








