— दुष्काळाला राजकीय रंग देऊ नका; आ. नाना पटोले यांचा सरकारला इशारा
हंसराज,साकोली :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून भंडारा जिल्ह्यातील लाखनी आणि साकोली या दोन तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने लादलेला अन्याय असून, दुष्काळाचे निकष ठरवताना मतदारसंघातील आमदार कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जाते का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. शासनाने खरीप हंगामातील निकषांनुसार जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी आणि तुमसर या पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू केल्या आहेत; मात्र लाखनी आणि साकोलीला यातून डावलण्यात आले. वास्तविक पाहता या दोन्ही तालुक्यांत पाण्याची भीषण टंचाई आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर आ. पटोले म्हणाले की, “दुष्काळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांपुरता मर्यादित नसतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान राजकीय निष्ठा पाहून होत नाही. केवळ विरोधी पक्षाचा आमदार असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती आणि आर्थिक मदतीपासून वंचित ठेवणे अमानुष आहे.” केवळ कागदोपत्री निकषांवर अवलंबून न राहता प्रशासनाने प्रत्यक्ष पीक नुकसानीचा निष्पक्ष फेरआढावा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचा हा प्रश्न राजकारणाचा नसून त्यांच्या जगण्या-मरण्याचा आहे. सरकारने हा दुजाभाव तात्काळ दूर करून लाखनी व साकोलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक रस्त्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, असा परखड इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.








