– आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
– २,९०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ; ड्रॅगन पॅलेस परिसरात धम्मबांधवांची उसळली गर्दी
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी आणि दलित शोषित व बिडी कामगारांचे नेते कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज १४ ऑक्टोबर रोजी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस कॅम्पसमध्ये विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात १२१५ तर नेत्र तपासणी शिबिरात तब्बल १७२० अशा एकूण २,९३५ गरजू रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार व योग्य सल्ला देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी भूषविले.
दिवसभरातील उपक्रमांनी परिसर गजबजला विशेष बुद्धवंदना व अभिवादन:
सकाळी १०.०० वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर १०.३० वाजता ड्रॅगन पॅलेस कॅम्पसमधील कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या पूर्णाकृती शिल्पाला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर:
सकाळी ११.०० वाजता एम.टी.डी.सी. हॉलमध्ये भव्य शिबिराचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीरंग वराडपांडे आणि डॉ. विलास सपकाळ उपस्थित होते. या शिबिरात स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर, नागपूर; डॉ. महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर; आशा हॉस्पिटल, कामठी आणि लायन्स क्लब, कामठी यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सेवा दिली.
या संपूर्ण भव्य उपक्रमाचे यशस्वी आयोजन ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन इंटरनेशनल स्कूल आणि ओगावा इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








