spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ

– बृहन्मुंबईच्या एफ/उत्तर विभागाच्या कार्यालयात समाधान शिबिर संपन्न

मुंबई :- सेवा संकल्प अभियानांतर्गत बृहन्मुंबईच्या एफ/उत्तर विभागाच्या कार्यालयात समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिरात शिधावाटप, नोंदणी व मुद्रांक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, आपले सरकार, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, आधार कार्ड तसेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना यांसह विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी शिबिरात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विशेष शिक्षक गौरव प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे प्रमाणपत्र, नवीन वीजजोडणी तसेच नावातील दुरुस्तीशी संबंधित प्रमाणपत्रे आणि महिला बचत गटांना आवश्यक प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासह शासकीय योजनांची माहिती देण्यावर या शिबिरात भर देण्यात आला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार, मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या जवळ पोहोचत असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. समाधान शिबिरांमुळे विविध सेवांचा लाभ आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Popular Articles