नागपूर १३ : भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेले मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बुधवारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी औपचारिक सदिच्छा भेट घेतली. न्यायव्यवस्थेत वंचित घटकांचे प्रतिनिधित्व वाढवणारी ऐतिहासिक पायरी म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती देशभरात स्वागतार्ह मानली जाते. समाजाच्या तळागाळातून आलेल्या त्यांच्या कार्यकिर्दीने घटनात्मक तत्त्वांचे रक्षण आणि सामाजिक न्यायाची कास धरण्याची सातत्यपूर्ण भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर जयदीपभाई कवाडे यांनी त्यांची भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या, अशी माहिती प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या भेटीत मुख्य न्यायाधीश गवई व जयदीप कवाडे यांच्यात न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा, ग्रामीण भागात न्यायाची सहज उपलब्धता तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण या विषयांवर सखोल चर्चा झाली. हा संवाद केवळ तात्कालिक मुद्द्यांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील धोरणात्मक दृष्टीकोनाचा मार्गही दाखवणारा ठरला. जयदीप कवाडे यांनी या निमित्ताने भूषण गवई यांच्या कार्यकिर्दीतील सत्यनिष्ठा, न्यायदानातील निष्पक्षता आणि वंचित घटकांबद्दलची संवेदनशीलता यांचा विशेष गौरव केला. गवई यांचे मार्गदर्शन हे केवळ न्यायालयापुरते मर्यादित नसून, समाजाच्या सर्व स्तरांवर सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, असे कवाडे यांनी सांगितले.








