– शिक्षक प्रियकराचे कृत्य; फरशीखाली पुरलेला मृतदेह मध्यरात्री काढला
हिंगणा :- चंद्रपूर येथील वैशाली विलास टिपले (वय ४५) या महिलेचा खून करून तिचा मृतदेह हिंगणा येथील आधार नगरी परिसरातील स्वतःच्या रिकाम्या घरात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेचा प्रियकर संतोष भगवान साखरकर (वय ४९, रा. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी व्यवसायाने शिक्षक असून, त्याचे वैशाली यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
वादातून खून केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी दोघेही एकत्र असताना काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून संतोष याने वैशाली यांच्या छातीवर जड वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह स्वतःच्या कारच्या डिक्कीत ठेवून तो एक दिवस तसाच ठेवला.
आरोपीने काही वर्षांपूर्वी हिंगणा येथील आधार नगरी परिसरात घर विकत घेतले होते. हे घर सध्या रिकामे होते. १५ ऑक्टोबर रोजी तो मृतदेह कारमधून घेऊन हिंगणा येथे आला. घराच्या मागील खोलीत खड्डा खोदून त्याने मृतदेह पुरला आणि त्यावर फरशी बसवली. त्यानंतर तो चंद्रपूरला परत गेला. दरम्यान, चंद्रपूरहून हिंगण्याकडे येताना त्याने वैशाली यांचा मोबाईल रेल्वेच्या एका बोगद्यात फेकून दिल्याची माहिती आहे.
मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपूर पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान त्यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. मोबाईलच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी संतोष साखरकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिल्याचे सांगण्यात येत असून, मृतदेह हिंगणा येथील घरात पुरल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
मध्यरात्री खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला
चंद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे व त्यांचे पथक आरोपीला घेऊन शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हिंगणा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर हिंगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप घोंगे आणि उपनिरीक्षक संतोष राठोड यांनी संबंधित तहसीलदारांना घटनेची माहिती दिली.
नायब तहसीलदार नितीन गोहणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत आणि व्हिडिओ चित्रीकरण करत रात्री दीड वाजताच्या सुमारास खड्ड्यात पुरलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.
या घटनेमुळे हिंगणा परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहेत.








