spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

नवी दिल्ली :- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.

राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना येत्या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण तसेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला. राष्ट्रपती यांना ध्वजाराहेणाच्याच दिवशी होणाऱ्या गोदा आरती, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उदघाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफीटेबल बूक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाचे अनावरणासाठी देखील आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रसंगी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती विवेक सोनुणे,नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

कुंभमेळा-महाराष्ट्र संस्कृती दर्शवणारे अनोखे निमंत्रन 

राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा या भेटवस्तू संचात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध अशा विविध उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा या संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व काळ्या मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. नाशिकच्या खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासह निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे.

Popular Articles