– वाकोडीतील चांद शाह दर्गाहवर बुलडोझर
– नोटीस न दिल्याचा भाविकांचा आक्षेप
नागपूर :- सावनेर तालुक्यातील वाकोडी येथील चांद शाह दर्गाहवर सोमवारी (दि.१७) पहाटे महसूल विभाग आणि खापा पोलिसांच्या बंदोबस्तात पाडकामाची कारवाई करण्यात आली. पहाटे ४ ते ५.३० वाजेदरम्यान दोन जेसीबींच्या साहाय्याने दर्गाह जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधितांना पूर्वसूचना किंवा नोटीस न दिल्याचा आक्षेप भाविकांनी घेतला आहे. वाकोडी येथील शंकर देवस्थानच्या मालकीच्या जागेवर दर्गाहचे बांधकाम असल्याचा दावा शिवमंदिर ट्रस्ट कमिटीने केला होता. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच भूमी अभिलेख विभागाकडून जागेची मोजणीही करण्यात आली होती. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सावनेर, पारशिवनी आणि खापा पोलिस ठाण्यांतील सुमारे ६० पोलिस कर्मचारी तैनात होते. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कैलास अल्लेवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दर्गाह कमिटीला नोटीस देण्यात आली होती का आणि कोणत्या अधिकृत आदेशानुसार पाडकाम करण्यात आले, असा सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे. यावर अल्लेवार यांनी शिवमंदिर ट्रस्टच्या मागणीनुसार पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले. कारवाईबाबत आक्षेप असल्यास अपील करण्याची सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, शंकर देवस्थानच्या विकासासाठी शासनाने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जमिनीच्या मालकीचा वाद आणि पाडकामाची कायदेशीर प्रक्रिया यामुळे वाकोडीतील हे प्रकरण चर्चेत आले आहे.





