spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA कडून सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर

 

न्यू दिल्ली  १८ : उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया ९ सप्टेंबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (NDA) तर्फे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “NDA च्या घटक पक्षांशी व्यापक चर्चा केल्यानंतर राधाकृष्णन यांचे नाव ठरवण्यात आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षांशीही संपर्क साधला असून त्यांचा पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा आहे.”

नड्डा पुढे म्हणाले की, “विरोधकांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा निर्णय उमेदवार कोण आहे यावर अवलंबून असेल. त्यामुळे या निवडणुकीत सर्वानुमते उपराष्ट्रपती निवडले जातील अशी आशा आहे.”

सी. पी. राधाकृष्णन हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल (२०२३–२०२४) तसेच तेलंगणाचे कार्यवाह राज्यपाल होते. त्याआधी ते केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीचे उपराज्यपाल राहिले आहेत. ते दोन वेळा लोकसभा सदस्य म्हणून कोयंबटूर येथून निवडून आले असून भाजपच्या तमिळनाडू राज्य अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

दिल्लीतील पक्ष मुख्यालयात झालेल्या ११ सदस्यीय संसदीय मंडळाच्या बैठकीत या निवडणुकीसाठी विविध नावे चर्चेत आली आणि सखोल विचारविनिमय झाला. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक राजीनामा दिल्याने ही पोकळी निर्माण झाली आहे.

या संसदीय मंडळात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, सरबानंद सोनोवाल, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, बी. एल. संतोष, संघटन सरचिटणीस, ओबीसी सेल प्रमुख के. लक्ष्मण, सुधा यादव, इक्बालसिंग ललपूरा आणि सत्यनारायण जाटिया यांचा समावेश आहे.

याआधी ७ ऑगस्ट रोजी NDA च्या बैठकीत घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले होते. त्या वेळी जेडीयूचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि टीडीपीचे राम मोहन नायडू यांनी त्याला दुजोरा दिला होता.

Popular Articles