नवी दिल्ली १८ : दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) द्वारका येथे रविवारी सकाळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळताच तातडीने शाळा रिकामी करण्यात आली. घटनास्थळी दिल्ली पोलीस, बॉम्ब शोध पथक तसेच अग्निशमन दल पोहोचले असून संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजधानीत अशा प्रकारच्या वारंवार धमक्या मिळत असून हा प्रकार त्याचाच एक भाग मानला जात आहे. १८ जुलै रोजी दिल्लीतील तब्बल ५० पेक्षा अधिक शाळांना एका सकाळी ईमेलद्वारे बॉम्ब धमक्या आल्या होत्या. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. या शाळांमध्ये सिव्हिल लाईन्समधील सेंट झेवियर्स, पश्चिम विहारमधील रिचमंड ग्लोबल स्कूल, रोहिणीतील अभिनव पब्लिक स्कूल आणि द सॉव्हरिन स्कूल यांचा समावेश होता.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला द्वारकातील सेंट स्टीफन्स कॉलेज व सेंट थॉमस स्कूललाही अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. त्याआधी सलग तीन दिवस शहरातील विविध शाळांना किमान सात ठिकाणी अशा ईमेल्स मिळाल्या होत्या.
पोलिसांच्या तपासात या धमक्यांपैकी एक ईमेल दक्षिण दिल्लीतील केवळ १२ वर्षीय मुलाने केवळ खोड्या म्हणून पाठवल्याचे निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करून समुपदेशन करण्यात आले आणि त्याला घरी सोडण्यात आले.
जरी आतापर्यंत सर्व धमक्या खोट्या ठरल्या असल्या तरी पालक आणि शाळा प्रशासनामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. आप पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी यापूर्वी केंद्र सरकार आणि भाजप प्रशासनावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “मुलं, पालक आणि शिक्षक यांना होत असलेल्या मानसिक त्रासाचा विचार करा. दिल्लीतील शासनाचे सर्व इंजिन्स भाजपच्या नियंत्रणात असूनही आपल्या मुलांच्या सुरक्षेची हमी देता येत नाही, ही धक्कादायक बाब आहे!”
दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत प्रत्येक धमकीची पडताळणी होत नाही तोपर्यंत खबरदारी म्हणून शाळा रिकामी करण्याची प्रक्रिया सुरूच राहील. रविवारी डीपीएस द्वारकाला मिळालेल्या फोन कॉलचा स्रोत शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.




