गोंदिया १८ : शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोंदिया शहरात पुन्हा एकदा मोठ्या दरोड्याचा कट उधळण्यात यश आले आहे. तलवारी, विळा, लोखंडी रॉड आणि मिरची पावडरसारखी घातक शस्त्रे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या काही साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला आहे.
कुंभारेनगर परिसरात मध्यरात्री कारवाई
ही घटना मध्यरात्री कुंभारेनगर परिसरात घडली. आंबेडकर भवनाजवळ गस्त घालणाऱ्या शहर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी घनश्याम उर्फ गोलू चौधरी आणि मित्तल तुपटे या दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून तलवारी, विळा, लोखंडी रॉड, मशाल, मिरची पावडर आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल, साथीदारांचा शोध सुरू
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१० (४), शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून, पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे गोंदिया शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
शहर पोलिसांकडून गस्त वाढवण्याचे निर्देश
या घटनेनंतर शहर पोलिसांनी गस्त वाढवण्याचे आदेश दिले असून, संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.








