spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या मुलींची ऐतिहासिक विजय अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्रता

– यवतमाळच्या भूमिका गेडाम व रेणुका दराडे यांचा विजयी संघात समावेश

सुरत येथे आयोजित पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने शानदार कामगिरी करत बरकत उल्ला विद्यापीठ, भोपाळच्या संघाचा पराभव केला. या दिमाखदार विजयासह अमरावती विद्यापीठाच्या संघाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या ऐतिहासिक यशामुळे अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमरावती विद्यापीठाच्या संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १३५ धावा उभारल्या. यामध्ये ग्रीष्मा ताटे हिने नाबाद ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. विजयासाठी १३६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला बरकत उल्ला विद्यापीठ, भोपाळचा संघ अमरावतीच्या भेदक गोलंदाजीसमोर अपेक्षित धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला.

अमरावती विद्यापीठाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अपूर्वा लाखदे हिने २.५ षटकांत केवळ १५ धावा देत २ बळी मिळवले, तर जान्हवी हिने ४ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले. ग्रीष्मा ताटे व शालमाली यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

या विजयी संघामध्ये प्राची, अरहिया, शालमाली, ग्रीष्मा , श्रुती, रेणुका दराडे, जान्हवी, अपूर्वा लाखदे, दिशा आणि भूमिका गेडाम या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या भूमिका गेडाम व रेणुका दराडे या दोन कन्यांनी या ऐतिहासिक विजयी संघाचे प्रतिनिधित्व करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.

या यशासाठी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक बाळासाहेब नवघरे आणि व्यवस्थापक डॉ. विनोद कपिले यांचे विशेष अभिनंदन होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या सांघिक प्रयत्नांमुळे अमरावती विद्यापीठाच्या संघाला हे उल्लेखनीय यश संपादन करता आले.

Popular Articles