तिरोडा १९ : अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहानिमित्त तिरोडा पोलीस विभागातर्फे सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) दुपारी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
ही रॅली उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वात पार पडली. रॅलीमध्ये विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“नशामुळे शरीराचे नुकसान होऊन संपूर्ण कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. समाजाला नशामुक्त करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
“नशा सोडा, जीवन जगवा, भविष्य घडवा” अशा घोषणांनी रॅलीदरम्यान शहरात वातावरण भारले होते.
यावेळी तिरोडा तहसीलदार नारायण ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम, संजय कोडे तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. नागरिकांचाही मोठा सहभाग लाभला.








