कामठी ता २० : राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या मान्यतेने कामठी नगर परिषद क्षेत्रातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली आहे. महाराष्ट्र नगर परिषद ,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 9,10 व 341 (ब)अनव्ये ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रभाग रचनेत एकूण 34 नगरसेवकांची निवड होणार असून त्यासाठी एकूण 17 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.प्रभागनिहाय व्याप्ती व आरक्षणाची माहिती अधिसूचनेच्या अनुसुचिमध्ये दिलेली आहे. ही अधिसूचना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागूं राहणार आहे.या अधिसुचनेविषयी नागरिकाना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती किंवा सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.इच्छुकांनी आपल्या सूचना कामठी नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात.31 ऑगस्ट 2025 निश्चित तारखेच्या नंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.शासनाच्या नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार प्रत्येक प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व न्याय पद्ध्तीने होण्यासाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक लोकसंख्या,भौगोलिक व्याप्ती तसेच आरक्षणाचे नियम यांचा विचार करण्यात आला आहे.
नागरिकाकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल त्यानंतरच कामठी नगर परिषद साठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. ही अधिसूचना जाहीर झाल्यामुळे कामठी नगर परिषद च्या निवडणुकीची रंगत आणखीच वाढली आहे.स्थानिक नागरिक,
संभाव्य उमेदवार आणि विविध राजकीय पक्ष यांचे लक्ष आता प्रभागनिहाय आरक्षण व अंतिम यादीवर केंदित झाले आहे.
कामठी नगर परिषद ची प्रभाग रचना अधिसूचना जाहीर









