‘महाज्योती’च्या हरित संकल्प मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
43
नरेंद्र नगर परिसरात दीड हजार रोपांची लागवड

मुंबई २५ : शिक्षणाच्या दीपस्तंभाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची मशालही उंचावणारी महाज्योती आता समाजासमोर नवा आदर्श निर्माण करीत आहे. फक्त मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमापुरती मर्यादित न राहता, पुढच्या पिढीसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करणे” हा ध्यास घेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर तर्फे ‘महाज्योती’चा हरित संकल्प’ ही हरित मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत रविवारी नरेंद्र नगर परिसरातील अरविंद, विजयानंद व उज्वल सोसायटी येथे तब्बल दीड हजार रोपांची लागवड करून हरित महाराष्ट्राचा नवा पाया रचण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी  कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते सहाय्यक पोलिस आयुक्त मा. नरेंद्र हिवरे, ग्रीन फाउंडेशनचे मा. दिलीप चिचमलातपुरे, ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे तसेच स्मिता मिलिंद नारिंगे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष औचित्य लाभले. नरेंद्र नगर परिसरातील अरविंद, विजयानंद व उज्वल सोसायटी येथे वृक्षारोपण उपक्रमात तब्बल दीड हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री म्हणाले की, समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारी ‘महाज्योती’ संस्था आता हरित क्रांतीसाठी सरसावली आहे. शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रापुरती मर्यादा न ठेवता, संस्थेने पहिल्यांदाच पर्यावरण संवर्धनाचा ऐतिहासिक उपक्रम सुरू केला असून, नागपूरातून दीड हजार रोपांची लागवड नागपूरातून होणे ही केवळ एक घटना नसून, भावी पिढ्यांसाठी हरित वारशाचा संकल्प आहे. ‘महाज्योती’ने घेतलेली ही पहिलीच हरित पुढाकार योजना असून, तिच्यामार्फत संस्थेने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे, असे मार्मिक उद्गार कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री यांनी काढले. याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सहाय्यक पोलिस आयुक्त मा. नरेंद्र हिवरे म्हणाले की, पोलिस सेवेत शिस्त, समर्पण आणि ध्येयवाद या मूल्यांना महत्त्व दिल्याचा उल्लेख करून त्यांनी केला. याच मूल्यांचे संस्कार ‘महाज्योती’ आपल्या उपक्रमांतून समाजामध्ये रुजवत आहे. त्यामुळे ही संस्था विद्यार्थ्यांसोबतच संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. गुन्हेगारीविरोधात निडर आणि प्रामाणिक सेवा बजावत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारताचे राष्ट्रपती यांनी सन्मानित केले. हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून समाजातील प्रत्येक कष्टकरी, संघर्षशील व्यक्तीचा सन्मान असल्याचे नरेंद्र हिवरे यांनी नमूद केले. ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक मा. दिलीप चिचमलातपुरे यांनी ‘महाज्योती’च्या कार्याचे कौतुक करताना आपला मनोगत व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘महाज्योती’ ही संस्था शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून समाजात प्रकाश पसरवत आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, त्यांच्या स्वप्नांना बळ देणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे ही ‘महाज्योती’ची मोठी देण आहे, असल्याचेही चिचमलातपुरे यावेळी म्हणाले. वृक्षारोपण उपक्रमात दीड हजार रोपट्यांची लागवड करण्यामध्ये पुण्याची ज्ञानदीप अ‍ॅकेडमी, स्पेक्ट्रम अ‍ॅकेडमी, नागपूरची पिरॅमिड ट्यूटोरियल व प्रियदर्शनी चॅरिटेबल सोसायटी, तसेच पुण्याची सीआरजी अ‍ॅकेडमी, या शैक्षणिक-सामाजिक संस्थांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले, प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये आणि शुभम वैलथरे यांनी अथक परिश्रम घेतले.