मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मनपामध्ये आढावा बैठक
नागपूर, ता. २५ : शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी शुक्रवारी (ता. २२) आढावा बैठक घेतली.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. नितीन फुके, मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू) चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सनी मगर, वेट्स फॉर ऍनिमल संस्थेचे डॉ. राहुल बाम्बोटकर, क्रिष्णा सोसायटी फॉर ऍनिमलचे डॉ. तस्सवू शेख, इंडिपेंडेंट ऍनिमल वेलफेअर सोसायटीचे डॉ. इफ्फात साबरी, पशु प्रेमी करिश्मा गिलानी, अंजली वैद्य आदी उपस्थित होते.
शहरातील मोकाट प्राण्यांना हाताळणे व त्यांच्यावर नियंत्रणाच्या दृष्टीने ‘एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) कॅम्प’ची क्षमता वाढवण्याची गरज असल्याबाबत चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली. नागपूर शहरामध्ये सध्या भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाराज बाग येथे ‘एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) कॅम्प’ कार्यरत आहेत. प्राण्यांच्या नसबंदीला गती देण्यासाठी अधिक पायाभूत सुविधा वाढविण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला. एबीसी आणि रेबीजविरोधी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्य आणि पाठिंब्यासाठी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांशी अतिरिक्त आयुक्त बैठक घेतील असाही निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. याशिवाय रेबीज जागरूकतेसाठी स्थानिक समुदायांना रेबीज प्रतिबंध आणि लसीकरणाबद्दल शिक्षित करण्याच्या देखील सूचना त्यांनी केल्या.
शहरात कार्यरत तिनही एबीसी कॅम्प’मधील प्रगती आणि कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी एमएसयू चे पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे एबीसी कॅम्पचे मासिक रेकॉर्ड राखण्याची जबाबदारी देण्यात आली. शहरातील पाळीव कुत्र्यांची नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे देखील निर्देश अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दिले. ज्या व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला त्या रुग्णापर्यंत वैद्यकीय मदत व रेबीज लसीकरण झाल्याची खातरजमा करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागा अंतर्गत आशा सेविकांकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. रेबीज प्रतिबंधाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दिले.



