नवीन गॅस कनेक्शन घेतलं आणि त्याच दिवशी झाला भीषण स्फोट

0
59

29 वर्षीय महिलेचा मृत्यू, कोल्हापूर हादरले

कोल्हापूर २७ – कोल्हापूरातील कळंबा येथील एलआयसी कॉलनीत सोमवारी रात्री उशिरा झालेल्या गॅस स्फोटाच्या घटनेने परिसर हादरला आहे. नवीन पाइपलाइन गॅस कनेक्शन घेतल्यानंतर काही तासांतच घरात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत शीतल अमर भोजणे (वय 29) या महिलेचा मृत्यू झाला असून तिचे सासरे अनंत भोजणे (वय 60) गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर शीतलचे दोन लहान मुले प्रज्वल (5) आणि इशिका (3) यांना देखील भाजल्यामुळे उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ही घटना सोमवारी रात्री 11 वाजता घडली. घरातील स्वयंपाकघरात गॅस गळती झाल्यानंतर स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील भिंतींचे व खिडक्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शीतल यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 100 टक्के भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर चौकशी सुरू
या पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून सोमवारी सकाळीच नवीन कनेक्शन दिले गेले होते. प्राथमिक तपासात गॅस गळतीमुळेच स्फोट झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेनंतर संपूर्ण एलआयसी कॉलनी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी गॅस कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.या घटनेनंतर घरगुती पाइपलाइन गॅस सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, नवीन कनेक्शन दिल्यानंतर गॅस लीक टेस्ट योग्य प्रकारे केली नसल्याने ही भीषण दुर्घटना घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.