इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार – नागपूर हादरले  

0
59

 

नागपूर २९ : इंस्टाग्रामवर ओळखीच्या 18 वर्षांच्या तरुणाने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव दिवांशु मेरावी असून तो पाचपावली ठक्करग्राम येथे राहतो. त्याच्यावर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम 4 आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. पीडित मुलगी एका नामांकित शाळेत शिकते. दोन महिन्यांपूर्वी तिची इंस्टाग्रामवर आरोपीसोबत ओळख झाली. 23 ऑगस्ट रोजी ती उत्तर नागपुरातील समता नगर येथे तिच्या आजीच्या घरी एकटी असताना तिने त्याला गप्पा मारण्यासाठी बोलावले.

मुलीने बोलावल्यावर तो तिच्या घरी आला आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर ती खूप घाबरली आणि तिने कुणालाही काही सांगितले नाही. मात्र, तिच्या वागण्यातील बदल लक्षात आल्यावर कुटुंबियांनी तिला विश्वासात घेतले. तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांनी लगेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पालकांसाठी महत्त्वाचा संदेश:

या घटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या धोक्यांबद्दल पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल जागरूक करावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत भेटणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळण्याचा सल्ला मुलांना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीबद्दल जागरूक रहा.

@filephoto