– श्रीराम चैतन्य सेवा मंडळ महाल चा स्तुत्य उपक्रम
नागपूर :- श्रीराम चैतन्य सेवा मंडळ, नागपूर द्वारे आयोजित २४ तास श्रावण मासाचे औचित्य साधत भगवान शंकराच्या आशिर्वादाने अखंड शिवमहिम्न स्तोत्र पठणाचा ऐतिहासिक विश्वविक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली.
शनिवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मंगेश रामचंद्र सरदेशपांडे यांनी अखंड शिवमहिम्न स्तोत्र पठणास प्रारंभ केला. सलग २४ तास पठण करून दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या दिव्य संकल्पाचा समारोप झाला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया चे सहकारी परीक्षणासाठी उपस्थित होते.
या समारोप सोहळ्यास अध्यक्षस्थानी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष पूज्य राघवेंद्रानंद, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या सरकार्यवाहिका चित्रा जोशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक – रविंद्र भुसारी, मोहिते नगर संघचालक सुधीर दप्तरी, नगरसेवक श्रीकांत आगलावे, भाजपा आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष डॉ. श्रीरंग वराडपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात पूज्य राघवेंद्रानंद यांच्या शुभहस्ते मंगेश सरदेशपांडे यांना वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याच प्रसंगी शिवमहिम्न स्तोत्राच्या विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथात मूळ संस्कृत स्तोत्रासह त्याचा सुलभ मराठी अर्थ आणि प्रत्येक श्लोकाशी निगडित पौराणिक कथांचा समावेश आहे.
मान्यवरांच्या आशीर्वचनानंतर भगवान महादेवाच्या महाआरतीने या भक्तिमय आणि ऐतिहासिक उपक्रमाचा मंगलमय समारोप झाला.
या यशस्वी आयोजनासाठी धीरज चव्हाण, रुद्र घांग्रेकर, कार्तिक धारकर , वल्लभ काळीकर, अनिकेत मुळे, मानसी कठाळे , उदय ठाकरे, सुजल धुळधुळे, मयुरेश काळी, शिवभक्त व श्रीराम चैतन्य सेवा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.








