– नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ
‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चे उत्साहात उद्घाटन
‘सक्षम महिला विकसित महाराष्ट्र’
नवी मुंबई :- उमेद अभियान आणि लखपती दिदी या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’, उमेद मॉल आणि उमेद मार्ट सारख्या संकल्पनांमुळे ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी तयार तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध होत असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असून, मुंबई आणि नवी मुंबईच्या जनतेने महालक्ष्मी सरसला भेट देऊन बचतगटातील उत्पादीत वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. नवी मुंबईतील वाशी एक्झीबीशन सेंटर येथे “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2026” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाव्दारे दि. 24 मार्च ते 04 एप्रिल 2026 या कालावधीत ग्रामीण भागातून आलेल्या बचतगटांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्रीच्या विक्रीचे प्रदर्शन असलेल्या राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चे उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या शुभाहस्ते झाले. पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देऊन स्टॉलमध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता सुरज पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, ग्रामविकास मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्य अधिकारी नारायण गोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी निखिल कुमार ओसवाल, उपसंचालक राज्य ग्रामीण (सामान्य) श्वेता पालवे, अवर सचिव धनवंत माळी, तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने उद्घटन सोहळ्याचा शुभारंभ झाला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत आयोजित ‘महालक्ष्मी सरस 2026’ या प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपऱ्यातील बचत गटांतील महिला, तसेच लघुउद्योजिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाशी जोडून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे मोठे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ संकल्पनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील महिलांच्या उत्पादनांना मोठ्या शहरांमध्ये विक्रीची संधी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रदर्शनांमुळे महिलांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते, असेही त्यांनी नमूद केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 1 लाख 75 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. लाभार्थ्यांनी वेळेवर कर्जफेड केल्यास त्यावरील व्याज महामंडळामार्फत परत करण्यात येते, ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी ‘महालक्ष्मी सरस 2026’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असल्याचे नमूद केले. या विक्री व प्रदर्शनातून महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असून, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि देश अधिक बळकट होतो, असा ठाम विश्वास महापौरांनी व्यक्त केला. जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत आजची महिला समाजाच्या प्रगतीची मुख्य शक्ती बनली असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि देश अधिक बळकट होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात महिलांनी दाखवलेल्या जिद्दीचे उदाहरण देत त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेचे कौतुक केले. तसेच नवी मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महापौर पाटील यांनी केले.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ‘महालक्ष्मी सरस 2026’च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याचे सांगितले. 2011 पासून सुरू झालेल्या उमेद अभियानाने आज लाखो महिलांना बचत गटांद्वारे स्वावलंबी बनवले असून राज्यातील कोट्यवधी कुटुंबांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.‘लखपती दीदी’ उपक्रमातून महिलांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत मोठ्या प्रमाणावर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘उमेद मार्ट’व ‘उमेद मॉल’सारख्या उपक्रमांमुळे महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी उत्पादनाची गुणवत्ता टिकवून डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःची बाजारपेठ निर्माण करावी, असे आवाहन सागर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी प्रास्ताविक भाषणात महाराष्ट्रातील ‘उमेद’ अभियानाने राज्यातील 34 जिल्हे आणि 351 तालुक्यांमध्ये विस्तार करत 6 लाख 67 हजार 051 स्वयं सहायता समूह, 34 हजर 552 ग्रामसंघ आणि 1 हजार 965 प्रभाग संघ उभारले असल्याची माहिती दिली. या माध्यमातून 65 लाख 44 हजार 094 महिलांसह जवळपास 60 लाख कुटुंब सहभागी झाले असून, 13 हजार 260 उत्पादक गट आणि 364 महिला शेतकरी कंपन्यांची निर्मिती झाली आहे. उद्योग क्षेत्रात 10.94 लाख कुटुंब बिगर शेती आधारित, 39.58 लाख कुटुंब शेती आधारित तर 23.28 लाख कुटुंब पशुधन व्यवसायात सक्रिय आहेत. आर्थिक सक्षमीकरणासाठी मागील आर्थिक वर्षात 10 हजार 728 कोटी आणि सन 2025-2026 या आर्थिक वर्षात 9 हजार 244 कोटी रुपयांचे ऐतिहासिक कर्ज वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 48 हजार 178 कोटी रुपयांचा पतपुरवठा झाला आहे. या भक्कम पाठबळामुळे ‘लखपती दीदी’ संकल्पना वेगाने साकारत असून, महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर अग्रस्थानी पोहोचला आहे. असेही माळी यांनी नमूद केले.