हंसराज, प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे एका लग्नाच्या रिसेप्शनसाठी आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना २० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज रमेश निंबार्ते (वय २८, रा. रामपूर, ता. मोहाडी) हे २० जानेवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मांडेसर येथील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आले होते. त्यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल (क्रमांक MH 36 T 2955) शाळेच्या समोर पार्क केली आणि ते कार्यक्रमात गेले. कार्यक्रम आटोपून परत आले असता, त्यांना आपली मोटारसायकल त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी चोरी झाल्याची तक्रार दिली.
अज्ञात चोरट्याने ३५,००० रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. पंकज निंबार्ते यांच्या तोंडी रिपोर्टवरून मोहाडी पोलिसांनी अपराध क्रमांक १३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार खोकले हे करीत आहेत.
वाढत्या दुचाकी चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.